बारामती : इंदापुर तालुक्यात गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकरणी अज्ञात मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, इंदापुरात ओबीसी एल्गार मेळावा संपल्यानंतर गोपीचंद पडळकर दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी निघाले असतांना त्यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली होती. (Gopichand Padalkar)
राज्यभरात पडसाद
गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे. राज्यभरात ओबीसी समाज आणि धनगर समाजाकडून आंदोलनं केली जात आहे. तसेच जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करून टायर जाळण्यात आले असून राज्यभरात ठिकठिकाणी अशाच प्रकारे आंदोलनं होताना दिसत आहे.
गोपीचंद पडळकरांवर दाखल करा : मराठा आंदोलक
दरम्यान, एकीकडे पडळकरांवर चप्पलफेकप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असतानाच, दुसरीकडे पडळकरांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. पडळकरांवर त्यांच्याच माणसांनी चप्पलफेक केली असून त्यांची माणसंच आमच्यावर धावून आल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला होता. त्यामुळे, पडळकरांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी मराठा आंदोलक करत आहेत .