मुंबई : विधानसभा निवडणूका झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तीन ठिकाणी मोठे यश मिळाले आहे. या तीनही ठिकाणी भाजपची सत्ता स्थापन होणार असल्याने भाजपचा आत्मविश्वास आणखीच वाढला आहे. यामुळे आरएसएस आणि भाजप अॅक्शन मोडवर आले असून, मुंबईच्या म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये बैठका सुरु झाल्या आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, लोकसभा मतदारसंघाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
लोकसभेचे वारे वाहत असल्यामुळे संघाच्या हालचालींना वेग आला आहे. शनिवारी (ता. ९) याच ठिकाणी बैठक पार पडली होती. तर, शनिवार आणि रविवार दोन दिवस संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे. यात सरकारची कामगिरी आणि लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती याचा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. मुंबईतील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र राज्य समन्वय आणि भाजप नेत्यांची ही बैठक होत आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे. तसेच, कोणत्या मतदारसंघात भाजपला प्रतिसाद मिळत असून, कोणत्या मतदारसंघात आणखी काम करण्याची गरज आहे याचा आढावा घेतला जात आहे. थेट बूथनिहाय कार्यकर्त्यांचा आढावा घेतला जात आहे. भाजपचे राज्यातील आणि केंद्रातील मंत्री आपापल्या मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून ताकदीने उतरण्याची तयारी सुरु असून, यासाठीच संघाची मदत देखील भाजपला मिळणार आहे.