Winter Session : नागपूर : नागपूर येथे उद्यापासून (७ डिसेंबर) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान यांसह राज्यातील विविधे मुद्दे या अधिवेशनासमोर ठेवण्यात येणार आहेत. त्याशिवाय, राज्यातील विविध प्रश्नांवर या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या आमदार अपात्रेचा निर्णयही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंत द्यायचा आहे. त्यामुळे अधिवेशन काळात आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी होणार का यावर राहुल नार्वेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेन गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी उपराजधानी सज्ज झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतरही मंत्री बुधवारी नागपुरात दाखल होत आहेत. नार्वेकर यांचे बुधवारी ६ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता आगमन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी ३ वाजता येणार आहेत.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरूवारपासून नागपुरात सुरू होत असून, त्यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ दोन आठवडे नागपुरात मुक्कामी असणार आहे. एकीकडे पावसाळी वातावरण आणि त्यामुळे तापमानात घट झाली असतानाच अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा संघर्ष रंगणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अधिवेशनासाठी राज्यातील विविध पक्षांचे आमदार नागपुरात आले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आरोप प्रत्यारोप होणार आहे. विरोधी पक्ष नेते सत्ताधारी नेत्यांवर काय आरोप करतात आणि त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय उत्तरे देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.