यवत / राहुलकुमार अवचट : मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहारज्ञान असावे. तसेच गणितातील किलो, डझन, बेरीज, वजाबाकी या संकल्पना स्पष्ट व्हाव्या या उद्देशाने यवत हेरीटेज स्कूल, यवत स्टेशन यांच्या वतीने शाळेच्या मैदानात आज आठवडे बाजार हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी स्वत: बाजार चालवून भाजीपाल्याची विक्री केली. पालक व इतर विद्यार्थ्यांनी खरेदी करत या उपक्रमात सहभाग घेतला. यात नर्सरी, ज्युनिअर व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे. तसेच गणितातील किलो, डझन, बेरीज, वजाबाकी या संकल्पना स्पष्ट व्हाव्या, विद्यार्थ्यांना शेतकऱ्याच्या मेहनतीची जाणीव व्हावी, अनोळखी व्यक्तीशी संवाद साधून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने आठवडे बाजार हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वत: पारंपारिक व आकर्षक पोषक परिधान करून भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी फळ भाजीची दुकाने सजवली होती. परिसरातील नागरिक,पालक व इतर विद्यार्थ्यांनी खरेदी करीत या उपक्रमात सहभाग घेतला.
या बाजारात पत्ताकोबी, फुलकोबी, बटाटा, भेंडी, काकडी, मुळा, पालक, मेथी, आवळा, पेरू, केळी तसेच कडधान्य, शेव, मुरमुरे, शेंगदाणे व शालेय साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. खरेदी करताना हिशेब, वस्तूची बारबाकाईने पाहणी याचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले.
घ्या हो घ्या, यवतची भेळ!
या बाजारात विद्यार्थ्यांचे स्लोगनमधून मनोरंजन करण्यात आले. घ्या हो घ्या ताजी भाजी, यवत हेरिटेज शाळा माझी इंग्लिशमध्ये कॅबेज, तर मराठीत म्हणतात पानकोबी यासारख्या स्लोगन्स लिहून विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक ज्ञान देण्यात आले.
यावेळी बालकांच्या या अनोख्या बाजारास यवत ग्रामपंचायतचे उपसरपंच सुभाष यादव, युवा नेते गणेश शेळके, किरण यादव युवराज मेहता, स्वप्निल शिर्के यांसह आदी मान्यवरांनी भेट दिली.
या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन यवत हेरिटेज स्कूलचे रोहन दोरगे, सोहन दोरगे, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाल मिस व शाळेचे शिक्षक वर्ग व कर्मचारीवृंद यांनी केले होते. यावेळी यवत हेरिटेज स्कूलच्या वतीने लहान मुलांच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात असल्याने यवतचे उपसरपंच सुभाष यादव यांनी यवत हेरिटेज स्कूल प्रशासनाचे व मुख्याध्यापिका व शिक्षक वर्गाचे कौतुक केले.