कर्जत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शुक्रवारी कर्जत येथील पक्षाच्या राज्यव्यापी शिबिरात केलेल्या भाषणात अनेक गौप्यस्फोट करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. यावेळी अजित पवार यांनी आपला पुतण्या आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर पहिल्यांदाच जाहीररित्या जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
पुण्यातून दसऱ्याच्या मुहूर्तावर निघालेली आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा येत्या १२ डिसेंबरला नागपूरला पोहचणार आहे. या यात्रेवरून नाव न घेता रोहित पवारांवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, “काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून राज्यभर संघर्ष यात्रा काढत आहेत. अरे, कसला संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आणि आता कशाचा संघर्ष?” असा खोचक टोला लगावत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. तसेच यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडांनाही त्यांनी डिवचलं. “मागे एकदा आमचे वरिष्ठ पावसात भिजले होते, तसं आता त्यांचा एक सहकारीही पावसात भिजला, अरे कशासाठी? त्याच्यावर एकदा हल्ला झाला होता, तेव्हा मीच आधार द्यायला गेलो होतो. मी सर्वांच्या पाठीशी उभा राहिलो, कारण आपल्यात तशी हिंमत आहे,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.