उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रेल्वे स्टेशनवर एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. कैलास मुसळे (वय-५४, रा. जय मल्हार रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या डोक्याला व हातावर जखमा आढळून आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास मुसळे हे उरुळी कांचन या ठिकाणी एकटे राहत होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकावर असलेल्या काही नागरिकांना एक व्यक्ती उरुळी कांचन येथील रेल्वे रुळाच्या बाजूला पडलेल्या अवस्थेत आढळून आली होती. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली.
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी मुसळे यांना उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.