Winter season : छत्रपती संभाजीनगर : थंडीची चाहूल लागताच छत्रपती संभाजीनगरमधील शहरवासी मध्यवर्ती बसस्थानकाजवळील तिबेटियन मार्केटमध्ये उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी करतात. मात्र, यंदा नोव्हेंबर महिना संपत आला तरी पुरेशी थंडी जाणवत नाही. याची झळ उबदार कपडे विक्री करणाऱ्यांना बसत आहे. यंदा थंडी कमी राहिली तर ग्राहकांची संख्या घटण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात पहाटेचे तापमान १३ ते १८ अंश सेल्सिअसदरम्यान राहिले आहे. तर दिवसभराचे तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातील पहाटेचे तापमान किमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे यंदा थंडी गायब असून याचा परिणाम उबदार कपडे विक्रेत्यांवर झाला आहे. सध्याच्या घडीला तिबेटियन बाजारात दैनंदिन सरासरीत केवळ ४ ते ५ उबदार कपड्यांची विक्री होत आहे. थंडीचा मौसम सुरू झाल्यास हीच संख्या ५० ते ६० वर जाते, असे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून तिबेटियन मार्केटमध्ये एकूण ५० स्टॉल लावण्यात आले आहे. तरीही ग्राहक आकर्षीले जात नाहीयेत. गतवर्षी मालाची विक्री होऊनही काही माल तसाच उरला होता.
मात्र, यावेळी देखील अशीच परिस्थिती कायम राहिल्यास, भरपूर माल उरणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तिबेटियन मार्केटमध्ये उबदार कपड्यांचे हे स्टॉल्स जानेवारी अंतिमपर्यंत सुरू राहतील. यंदा काही उबदार कपड्यांचे दर कमी झाले तर काहींचा दर तोच ठेवल्याची माहिती तिबेटियन स्वेटर विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष एस. डी. चौबेल यांनी दिली.
तिबेटियन मार्केटमधील सध्याचे दर
जर्किंग – ५५० ते १,५००
जॅकेट – ४५० ते १,३००
कॅप – १०० ते २७०
मफलर – २००
स्वेटर – ७९० ते १,३८०
शॉल – ४०० ते १,२००
उबदार शूज – २०० ते ५००
हॅन्डग्लोज – १५० ते २५०
सॉक्स – १५० ते २५०