जालना: जिल्ह्यातील अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर. सी. शेख यांनी ही माहिती दिली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते? याची माहिती मागवली होती. त्यानंतर जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर. सी. शेख यांनी वरील माहिती दिली. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कोणताही आदेश देण्यात आले नाहीत, असं त्यात म्हटलं आहे.
मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी 23 ऑगस्ट रोजी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला. पोलिसांच्या या लाठीचार्जनंतर त्यावेळी जोरदार दगडफेक देखील करण्यात आली होती.