राजेंद्रकुमार शेळके
भेटतात वाटेवर
अनेक वाटाडे,
मदतीचा हात देणारे
असतात फक्त थोडे…!
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. वर्षातील हा मोठा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, आजही असे कितीतरी लोक आहेत, जे या सणापासून वंचित आहेत. अशा वंचितांचा आधार म्हणून कार्यरत असणारे हात देखील आजही कार्यरत आहेत. आंदगाव (आटाळवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) येथील एक नवयुवक ह.भ.प. हनुमंत महाराज अटाळे हे त्यापैकीच एक!
दिवाळीदिवशी ज्यांच्या घरात अंधार होता, त्यांना मदतीचा हात देवून त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाशाचा आधार देण्याचे महान कार्य ते करत आहेत. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन समाजाचे ऋण ते फेडत आहेत. आपल्या तुटपुंज्या कमाईची पर्वा न करता, आई-वडिलांकडून मिळालेले सामाजिक बाळकडू अंगिकारून, हा तरुण पुन्हा एकदा समाजातील निराधार व गोर-गरीब लोकांच्या मदतीला धावून जात आहे.
आपला समाज दोन गटात मोडतो. एक ‘आहे रे’ आणि दुसरा ‘नाही रे’. यातल्या ‘आहे रे’ गटाकडे कधी कधी काही गोष्टी गरजेपेक्षा अधिक असतात आणि त्या कुणाला तरी देऊन टाकाव्यात असे त्यांना वाटतही असते. पण कुणाला? हा प्रश्न पडतो आणि गाडं अडकतं. देणार्याची प्रांजळ इच्छा असते की त्याने दिलेली वस्तू गरजू माणसापर्यंत पोहचावी. जसा एक दिवा अंधारात सर्वांनाच उजेड देतो, त्याचप्रमाणे खरंतर दिवाळी हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंदाची पहाट घेऊन येतो.
नवीन कपडे खरेदी, वाहन, प्लॉट, फ्लॅट यासह अनेकजण इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी करून आपला आनंद द्विगुणित करत असतात. मात्र, समाजात हलाखीचे जीवन जगणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस हा सारखाच असतो, असे प्रामाणिक मत ह.भ.प. हनुमंत महाराज अटाळे यांनी बोलताना व्यक्त केले.
समाजात आज अनेक प्रकारच्या व्यक्ती आहेत. काहीजण पूर्वजांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून आरामात जीवन जगतात, तर काहीजण दिवस-रात्र कष्ट करून, कष्टाची भाकरी खातात. नाण्याला दोन बाजू असतात, पण काहीजण फक्त नाण्याची एकच बाजू पाहतात. मुळशी तालुका हा निसर्गसंपत्तीत धनवान आहे.
डोंगर-दऱ्या अशा विविधतेने नटलेला असून, ठराविक जण या जैवविविध संपत्तीचा आधार घेत मालक बनले आहेत. परंतु आज श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चालला आहे, तर गरीब हा अधिक गरीब होत चालला आहे. ही आजच्या समाजव्यवस्थेची शोकांतिका आहे. यावर कोणताही राजकारणी किंवा श्रीमंत व्यक्ती या दुर्बल समाजाकडे पहात नाही.
अशा निराधार व दुर्बल लोकांच्या जीवनात आशेचा दिवा तेवत ठेवण्याचे महान कार्य हनुमंत महाराज अटाळे व त्यांचा परिवार गेली अनेक वर्षे करत आहे. अशा ठराविक लोकांच्या माध्यमातून समाजात माणुसकीचा दिवा तेवत आहे. अशा वंचित, दुर्बल ग्रामीण भागातील घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी अनेकांकडून मदतीचा हात दिला जातो. त्यामुळे अनेकांच्या जीवनात हास्य आणि आनंद निर्माण होतो. अशा अनेकांच्या मदतीतून त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने द्विगुणित होते.
जसा एक दिवा अंधारात उजेड पाडतो, तशी तुमची एक छोटीशी मदत या घटकाला लाख मोलाची ठरेल. तीच… एक छोटीशी मदत तुमच्या आनंदाचा दिवा असेल….! असा आत्मविश्वास हनुमंत महाराज अटाळे यांनी ‘पुणे प्राईम’शी बोलताना व्यक्त केला.