हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच आहे. ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी खुद्द लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी लक्ष घातले. त्यानुसार, शुक्रवार (ता. १७) पासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पोलीस चौकी या ठिकाणी वाहतूक समस्यासंदर्भात बैठकीचे आयोजन गुरुवारी (ता. १६) करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी यावेळी ही माहिती दिली.
यावेळी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस हवालदार रामदास मेमाणे, वाहतूक शाखेचे कर्मचारी आरती खलचे, गोसावी, आदी कर्मचारी तसेच जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित (बाबा) कांचन, सामाजिक कार्यकर्ते आदित्य कांचन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यापुढे बोलताना शशिकांत चव्हाण म्हणाले, “पुणे-सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूला अतिक्रमण झाले आहे. याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. परिणामी, वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शुक्रवारपासून सेवा रस्त्यावर तसेच महामार्गावर गाड्या लावून बिनदिक्कत फिरणाऱ्या नागरिकांच्या वाहनांवर ऑनलाईन दंड आकारण्यात येणार आहे”.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणाचा विळखा..
उरुळी कांचन येथील एलाईट चौक व तळवाडी चौकात महामार्गाप्रमाणेच सेवा रस्ते हे गर्दीने नेहमी फुल्लच पाहायला मिळतात. या सेवा रस्त्याने प्रवास करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली हॉटेल्स, विविध ढाबे, लोकांनी सोयीसाठी अनधिकृतपणे फोडलेले रस्ता दुभाजक, हॉटेलच्या ठिकाणी रस्त्यावर घातलेले गतिरोधक, सेवा रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण यासारख्या अनेक गोष्टी या रस्ते वाहतुकीसाठी असुरक्षित झालेल्या आहेत. महामार्गावर चारचाकी गाड्या थांबवणे, लेनची शिस्त न पाळणे, यामुळेही अपघातास आमंत्रण मिळत आहे. या वाहनांवर शुक्रवारपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कुठंही पार्किंग करा आणि बिनधास्त राहा..
पुणे-सोलापूर महामार्गावर कुठंही पार्किंग करा आणि बिनधास्त राहा, असे जणू नित्याचेच झाले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक आपापली दुकाने असलेल्या इमारती उभारल्या आहेत. त्या इमारतीत वाहने उभी करण्यासाठी कोणतेही वाहनतळ नाही. दुकानात ग्राहक जाताना त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहने चक्क रस्त्यावर उभी करून जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होतो व वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
पोलिस देणार दुकानदारांना नोटीस..
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुकाने तसेच पथारीवाले, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे खरेदीदारांची तसेच इतरांची वाहने मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूने पार्किंग केली जातात. पार्किंग करताना वाहने अस्ताव्यस्तपणे लावली जातात. त्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून पथकर नावाला असून, त्यावर टपरीवाले, भाजीविक्रेते आदी विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत. ही सर्व अतिक्रमणे काढण्यासाठी लोणी काळभोर पोलीस अगोदर संबंधित दुकानदारांना नोटीस देणार असून, नोटीसनंतर पोलीस कारवाई करण्याला सुरुवात करणार असल्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी यावेळी सांगीतले.
दिव्याच्या खांबावर फ्लेक्स लावणाऱ्यांवर फौजदारी दाखल करणार..
मागील आठ दिवसांपासून पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा या रस्त्यामधील दुभाजकावरील दिव्याच्या खांबावर बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्यांची संख्या अचानक वाढू लागली आहे. ग्रामपंचायतींनी उभारलेल्या या दिव्यांच्या खांबावर जाहिरात करता येत नसतानाही पूर्व हवेलीमधील अनेक हौसे-गवसे फ्लेक्स लावून आपापल्या जाहिराती करत आहेत. मात्र, जाहिरातींसाठी लागलेले फ्लेक्स रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांना विशेषतः दुचाकीचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. अशा जाहिरात लावणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.