अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना आमदार राम शिंदे यांनी ऐन लक्ष्मी पुजनाच्या दिवशी पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत शिंदे आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादीची साथ सोडत आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
रविवारी आमदार प्रा राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी लक्ष्मी पुजनाच्या दिवशी हा सोहळा पार पडला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी भाजपात प्रवेश केल्यामुळे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रवेशामुळे कर्जत-जामखेडसह परिसरात राजकीय भूकंप झाल्याचं बोललं जात आहे. यामुळे राष्ट्रवादीला जामखेड तालुक्यात मोठं भगदाड पडलं आहे.
युवा नेते प्रशांत शिंदे यांच्यासमवेत जवळा गावचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य शितल प्रशांत शिंदे, सोनाली राहूल पाटील, रफिकभाई शेख, राधिका मारूती हजारे, भाऊसाहेब महारनवर, मंगल आव्हाड, नंदा कल्याण आव्हाड, हरिदास हजारे, सारिका रोडे, जयश्री कोल्हे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी भव्य सत्कार चोंडी येथे राम शिंदे यांनी केला. जवळा ग्रामपंचायतवर आता भाजपच वर्चस्व सिद्ध झालं आहे.
९ पैकी ५ ग्रामपंचायतीवर राम शिंदेंचं वर्चस्व
गेल्या आठवड्यातच राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक झाल्या. यामध्ये खासकरून राजकीय नेत्यांचं कर्जत-जामखेडच्या ग्रामपंचायत निकालांवर लक्ष होतं. शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार हे या मतदार संघात आमदार आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांना पराभूत केलं होतं. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या निकालाकडे राज्यच लक्ष लागून होतं.
दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत राम शिंदे यांनी रोहित पवारांना धक्का देत एकूण 9 ग्राम पंचायती पैकी 5 ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला, तर रोहित पवार यांना 2 ग्रामपंचायतीवर आभार मानावे लागले. त्यातच आता भाजपा आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना पुन्हा एकदा धक्का देत, जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांनी भाजपात प्रवेश केला.