Pune News : पुणे : खिशातून गुपचूप ५०० रुपये काढल्याच्या कारणावरून एका २४ वर्षीय तरुणाचा लाकडी बांबूने मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हि घटना बुधवारी मध्यरात्री खराडी येथील म्हसोबा मंदिराजवळ घडली आहे.
आरोपी ताब्यात….
किरण अशोक साठे (वय-२४ रा. खराडी, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर लोकेश रविंद्र पाटील (वय – २२ रा. पाटील वस्ती, केसनंद, पुणे) खून केलेल्या आरोपी तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष मच्छिंद्र घोडके यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किरण साठे याने आरोपी लोकेश पाटील याच्या खिशातून गुपचूप ५०० रुपये काढून घेतले. याच कारणावरुन आरोपी लोकेश याने लाकडी बांबूने किरणच्या डोक्यात, हातावर व नाकावर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी होऊन किरणचा मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून किरण साठे याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.