मुंबई: मी अशा देशात जन्मलो आहे की, जिथे प्रभू राम आणि सीता यांचा जन्म झाला आहे. श्रीराम आणि सीता हे केवळ हिंदूचे दैवत नसून देशातील सर्व नागरिकांचे दैवत असल्याचे मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी व्यक्त केले आहे. आपण काही गोष्टी खुल्या पद्धतीने बोलल्या पाहिजेत, असं देखील ते म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन पटकथा लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी जावेद अख्तर बोलत होते. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
मनसेच्या दीपोत्सवाचे यंदाचे 11 वे वर्ष आहे. यावेळी राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख तसेच अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल की येथे जावेद अख्तर कसे. जावेद अख्तर हे तर नास्तिक आहेत. मग, धार्मिक कार्यक्रमाला कसे येतात. परंतु, राज ठाकरे माझे घनिष्ठ मित्र आहेत. राज ठाकरेंनी विरोधकाला बोलावले तरी ते येतील असे जावेद अख्तर म्हणाले. यावेळी जावेद अख्तर यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.