ST Strike: मुंबई : दिवाळीत प्रवाशांचा एसटी प्रवास अडथळ्याशिवाय सुसाट धावणार आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्तेनी जाहीर केलेला एसटी बंद संप मागे घेण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांबाबत या बैठकीत महत्वाच्या चार मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे, असं सामंत म्हणाले. पत्रकार परिषद घेत या बैठकीतील निर्णयाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले, एसटीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने एसटी कष्टकरी जनसंघाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुणरत्न सदावर्ते हे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहेत. जर एसटी कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होत असेल, तर त्यांना मदत करणं ही आमची भूमिका आहे. आमची एकम्द भूमिका स्पष्ट आहे, दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन केले आहे.
विलीनीकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत पंधरा दिवसात चर्चा करणार : सदावर्ते
सातवा वेतन आयोग आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंधरा दिवसात चर्चा होणार आहे. तसेच सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही तूर्तास सध्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करत आहोत.