पुणे : दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील सलग पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशाराही दिला आहे.
मुंबई, कोकणासह राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. तसेच आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज संध्याकाळी मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने कोकण आणि घाट परिसरात पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाने मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावस होईल. तर विदर्भात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला असून आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या बरोबरच विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पाऊस कोसळणार आहे.
दरम्यान, पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता राज्यातील मच्छिमारांना पुढील पाच दिवस मासेमारीसाठी अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागाने मच्छिमारांना दिल्या आहेत. पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी. असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.