पुणे : पाण्याची बाटली आणायला गेलेल्या १० वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना पुणे रेल्वे स्थानकावरील लोको शेडजवळ शनिवारी (ता.१०) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने लोकल ट्रेनच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेल्या चिमुकलीचे प्राण वाचले आहे.
मोहम्मद रफीक अमीर सुलेमानी (वय ५५, रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे या जिगरबाज मोटरमनचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद सुलेमानी हे एक लोकल ट्रेनचे मोटरमन आहेत. शनिवारी रात्री लोणावळ्यावरून पुणे स्टेशनकडे लोकल चालवित असताना, त्यांना पुणे स्टेशनजवळ एका चिमुकलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. सुलेमानी यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबून लोकल थांबवली. तेव्हा एक जण अंधारात चिमुकल्या मुलीचे तोंड दाबून तिला उचलून पळवून नेत असल्याचे दिसले. सुलेमानी यांनी आरडा-ओरडा केला. त्यानंतर आरोपी त्या मुलीला तेथेच टाकून पळून गेला. यावेळी प्रवाशांच्या मदतीने मुलीची सुटका केली. मात्र, आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
सुलेमानी यांनी मुलीची चौकशी केली असता, ती आईसोबत महालक्ष्मी एक्स्प्रेसने किर्लोस्करवाडी येथे निघाली असल्याचे समजले. त्यानंतर सर्वांनी तत्काळ प्लॅटफॉर्म नंबर एकवर धाव घेतली. त्यानंतर आईचा शोध घेऊन मुलीला त्यांच्या ताब्यात मुलीला दिले.
यावेळी चिमुकलीच्या आईला याबाबत विचारणा केली असता, तिने सांगितले कि, आम्ही दोघी प्लॅटफॉर्मवर बसलो होतो. यावेळी मी तिला पाण्याची बाटली आणायला पाठविले. ती मुलगी पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता, आरोपीने तिला येथे पाणी खराब मिळते. पुढे चांगले पाणी आहे, असे सांगितले व पुढे गेल्यावर जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी हा त्यांच्या शेजारीच बसला होता. आणि रेल्वे स्थानकावरून मुलीला ओढत घेऊन जात असताना दिसत आहे. मात्र, तक्रार नसल्याने याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.