बारामती, (पुणे) : रेड बर्ड कंपनीचे विमान बारामती परिसरातील जुना सह्याद्री काऊ फार्मनजिक लोखंडे वस्ती येथे पडल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. २२) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या अपघातात वैमानिक जखमी झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळू शकलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रेड बर्ड कंपनीचे व्हीटी आरव्हीटी टेक्नम या जातीचे दोन सीटर विमान होते. रविवारी सकाळी सातच्या सुमारास जुना सह्याद्री काऊ फार्मनजिक लोखंडे वस्तीच्या वरील बाजूस पडले. यावेळी सदर ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी याच रेड बर्ड कंपनीचे विमान बारामती विमानतळानजिक अपघातग्रस्त झाले होते. आज पुन्हा दुसरा अपघात झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. आजच्या अपघातातही विमानाच्या पुढील बाजूचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.