पुणे प्राईम न्यूज: केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम प्रति एलपीजी सिलेंडर 200 रुपयांवरून 300 रुपये केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी कपात करण्यात आली होती. आजपासून उज्ज्वला योजना लाभार्थ्यांसाठी सबसिडी ही 200 रुपयांवरून ती 300 रुपयांपर्यंत वाढवली जात आहे.
उज्ज्वला लाभार्थ्यांना सध्या 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 703 रुपये मोजावे लागतात, तर बाजारभाव 903 रुपये आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता त्यांना फक्त ६०३ रुपये मोजावे लागणार आहेत.
तसेच या मंत्रिमंडळ बैठकीत भारत सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. या मंडळामुळे हळदीबाबत जागरूकता निर्माण होईल. तसेच खप आणि निर्यात वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजारपेठ विकसित करण्यात देखील मदत होईल.