लोणी काळभोर, (पुणे) : आधुनिकतेसह पारंपारिक सणांत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्री छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिसरात एक वेगळी छाप पाडली आहे. सामजिक कार्य करणाऱ्या काही मंडळापैकी श्री छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळाचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो आहे.
या मंडळाची २०१४ साली स्थापना मंडळाचे आधारस्तंभ व सामाजिक कार्यकर्ते अविनाश उर्फ पप्पू बडदे यांनी केली आहे. तसेच मंडळाचे अध्यक्ष उत्कर्ष लंगोटे, सुनील कांबळे, कार्याध्यक्ष सौरभ कोलते यांच्या माध्यमातून मंडळाने आजपर्यंत विविध सामाजिक, राजकीय, व आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात येते.
जिथे स्त्रीला आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करता येतात. तिचे कलागुण जोपासले जाऊन तिची उन्नती होते आणि मुख्य म्हणजे काही क्षण ती स्वतःसाठी जगते, असे हक्काचे ठिकाण. म्हणूनच कित्येक मंडळे अनेक दशकांची वाटचाल करताना दिसतात. असेच एक मंडळ म्हणजे श्री छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ आयोजित गणेश फेस्टिवल होय.
मागील ९ वर्षांपासून श्री छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच डान्स शो कार्यक्रम घेण्यात आला. महिलांसाठी खास मंगळागौरी स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. भव्य होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले असून, सत्यनारायण पूजा व महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, श्री छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ आयोजित गणेश फेस्टिव्हल मोठ्या आनंदाने व पावित्र्याने उत्सव साजरा करते. केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर वर्षभरात विविध उपक्रम मंडळातर्फे राबविले जातात. ते आजअखेर सुरू आहेत. मिरवणुकांचे स्वागत करून त्यांच्या नाष्टाची व्यवस्था केली जाते. कोरोना परिस्थितीतही मंडळाचे कार्यकर्ते सातत्याने लोकांच्या मदतीला धावत होते.
मंडळाचे संस्थापक अविनाश बडदे, अध्यक्ष उत्कर्ष लंगोटे, उपाध्यक्ष सुमित कांबळे, कार्याध्यक्ष सौरभ कोलते, उत्सव प्रमुख विक्रांत मांगडे यांच्या नेतृत्वात अतिशय उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात भव्य गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते.