हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील शिंदवणे येथील ग्रामपंचायत हद्दीत लहान मोठ्या मंडळांसह घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना मंगळवारी (ता. १९) करण्यात आली. विघ्नहर्त्याची घरोघरी मोठ्या भक्तीभावाने प्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली.
अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजला आहे. गणेशोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच बच्चेकंपनी आज प्रथमच मोठ्या संख्येने गणपतीची मूर्ती खरेदी करताना दिसून आली. अनेकांनी सहकुटुंब बाप्पाला घरी नेले.
मंगळवारी सकाळपासूनच बाप्पांच्या प्रतिष्ठापनेसाठी बाजारपेठेतील रस्ते गर्दीने फुलले होते. पूजा साहित्य, मखर, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होती. गणेश मंडळांनी आपापल्या सजविलेल्या वाहनांतून वाजत – गाजत मोठ्या जल्लोषात श्री गणेशाची मूर्ती नेली. आकर्षक रंगसंगीत व विविध आकारातील मूर्ती विक्रीस होत्या. अनेक ठिकाणी नागरिकांनी शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्ती खरेदीवर भर दिला.
यावेळी भाविकांनी सकाळपासूनच केळीचे खोड, दुर्वा, श्री गणेश मूर्ती, पुजा, नारळ, गुलाल, साखरमिश्रीत खोबरे, मूर्तीसाठी विविध प्रकारचे हार, माळा, तोरण, श्री गणेशाच्या स्वागताच्या लहान कमानी, महिरपी लहान आसाने खरेदीसाठी गर्दी झाली होती. सोबत मोदक, पेढे यांनाही आज प्रचंड मागणी होती.
अनेक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान..
लोणी काळभोर गावातील श्रीमंत अंबरनाथ मित्र मंडळ, क्रांतिवीर व समता समाज मित्र मंडळ, महात्मा गांधी प्रतिष्ठान, जय महाराष्ट्र व जय बजरंग मित्र मंडळ, तिरंगा व गणराज मित्र मंडळ, आदर्श तरुण मंडळ, अखिल रायवाडी मित्र मंडळ, महात्मा फुले व त्रिमूर्ती मित्र मंडळ आदी मंडळांनी उत्साहात गणपती बाप्पांचे स्वागत केले. कदमवाकवस्ती गावाच्या हद्दीतील लोणी स्टेशन येथील श्रीगणेश मित्र मंडळ, मूनलाईट मित्र मंडळ व धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. संभाजीनगर येथील अष्टविनायक मित्र मंडळ, कदमवस्ती येथील सम्राटमित्र मंडळ, वाकवस्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मित्र मंडळ, कवडीपाट येथील श्री विनायक प्रतिष्ठान मित्र मंडळाने गणेश मूर्तींची प्रतिष्ठापणा केली.
उरुळी कांचनमधील आश्रम रोड परिसरातील महात्मा गांधी तरुण मंडळ, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, शिवछत्रपती मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ, बाजार मैदान येथील अनुपम मित्र मंडळ, भोलेनाथ तरुण मंडळ, गूळ आळी येथील श्रीमंत वीर तरुण मंडळ, तुपे वस्ती येथील नवजीवन मित्र मंडळ, महात्मा गांधी रास्ता परिसरातील श्रीकृष्ण मित्र मंडळ, साईनाथ तरुण मंडळ, पोलिस चौकी परिसरातील नवचैतन्य मित्र मंडळ, तळवाडी चौक परिसरातील अखिल तळवाडी मित्र मंडळ, शिंदवणे रोड येथील नव आझाद तरुण मंडळ या महत्त्वाच्या मंडळांप्रमाणेच परिसरातील सर्व गणेश मंडळे व घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली.
शिंदवणे येथील शिवछत्रपती तरुण मंडळ, सोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्र मंडळ, अखिल सोरतापवाडी सार्वजनिक गणेश गावठाण, गणेशनगर मित्र मंडळ, चिंतामणी मित्र मंडळ, एकता तरुण मंडळ, शिवतेज मित्र मंडळाने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली.
सोशल मीडियाही झाला ‘बाप्पामय’..
मित्रपरिवार, नातेवाईक यांना भेटणे शक्य नसल्याने व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. नेटकऱ्यांकडून श्री गणेशाचे फोटो एकमेकांना फॉरवर्ड केले जात आहेत. वेगवेगळे व्हिडिओ, स्टिकर्स, आरती संग्रह यामुळे सोशल मीडिया बाप्पामय झाला असून, नेटकऱ्यांनी कित्येक दिवस अगोदरपासून बाप्पांचे मेसेज व फोटो फॉरवर्ड करत आहेत. वेगवेगळे व्हिडिओज, आरती संग्रह याद्वारे सोशल मीडिया बाप्पामय झाला आहे.