शुभम वाकचौरे
जांबूत : शिरुर तालुक्यातील पिंपरखेडजवळ एका बांधकाम ठेकेदाराचे अपहरण करून, त्याच्यावर बंदूक रोखून जिवे मारण्याची धमकी देत, एक लाखाची खंडणी उकळल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता. २) घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील व्यवसायिकासह सामान्य वर्गात दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लियाकत नुरइस्लाम मंडल (वय ५४, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बांधकाम ठेकेदार असून, जांबुत परिसरात घरांची कामे मजुरीवर करून देण्याचा व्यवसाय करतात. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते पिंपरखेडवरून काठापूरच्या दिशेने मोटरसायकलवरून जात असताना एका नंबरप्लेट नसलेल्या स्विफ्ट कारमधून आलेल्या अंकूर पाबळे, आण्णा माकर व माऊली पाबळे यांनी त्यांना अडवले. मंडल यांना गाडीत बसवून, मारहाण करीत गाडी फाकटे शिवारात एका निर्जन ठिकाणी बंद घराजवळ त्यांना घेऊन गेले व जबर मारहाण केली.
या दरम्यान, आम्हाला १० लाख रुपये दे, नाहीतर तुला गोळ्या घालतो, असा दम भरला. या प्रकारामुळे घाबरलेल्या मंडल यांनी निरगुडसर येथे पत्नीला फोन करून, ‘काहीही करून एक लाख रुपये गोळा करून मुलाला पाठवून दे’, असा निरोप दिला. मुलगा एक लाख रुपये घेऊन आला. त्यालाही पिस्तुलाचा धाक दाखवून जर कुणाला सांगितले तर गोळ्या घालू, असा दम दिला. उर्वरीत रक्कम पुढील आठवड्यात जमा करा, असा दम देत बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये मंडल यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. पारगाव येथील खासगी रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान मंडल यांच्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध खंडणी, अपहरण व अडवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणावरून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असल्याने, सामान्य माणसाला मदत मिळणे अवघड झाले आहे. या भागात राजरोसपणे अवैध दारू व इतर धंदे सुरु आहेत. मात्र, खाकीच्या आशिर्वादामुळे अवैध धंद्यांमधून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली असून, सामान्य जनता हतबल झाली आहे. शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.