सासवड : शारीरिक व मानसिक छळ करून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या पतीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली आहे. हा निकाल न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांच्या खंडपीठाने दिला आहे.
गणेश शंकर पारसकर (मुळगांव- सायवणी, ता. पाथूर, जि. अकोला) अशी जन्मठेप ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मनिषा गणेश पारसकर (वय-२०. धंदा मजुरीकाम, मुळगांव- सायवणी, ता. पाथूर, जि. अकोला, सध्या राहणार भिवरी, ता. पुरंदर, शि.पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा पारसकर आणि गणेश पारसकर यांचा विवाह २०१५ ला रितिरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर ते दोघेजण नातेवाईकाकडे भिवरी, (ता. पुरंदर, पुणे) येथे काम करण्यास आले. तेथे दोघेजण १५ दिवस चांगल प्रकारे राहिले. त्यानंतर गणेश पारसकर याने पुन्हा मनिषाचा शारीरिक व मानसिक छळ करू लागला. आणि सोडचिट्टी करून घे असे म्हणून मनिषा मारहाण करीत होता.
आरोपी गणेश पारसकर याने ११ सप्टेंबर २०१५ला मनीषा झोपेत असताना, तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या आगीत मनीषा या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना सासवड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मनीषाची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तेव्हा आरोपी पती गणेश पारसकर याने मनीषाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यांमुळे मनीषाने फिर्यादीमध्ये स्टोचा भडका होवून भाजली. अशी फिर्याद दिली होती.
त्यानंतर मनिषाने तिच्या मनातील भीती संपल्यानंतर सदर प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पती गणेश पारसकर याला अटक केली होती. तर दुर्दैवाने या घटनेत मनीषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारपक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्ह्यात घटनेपुर्वीचे व घटनेनंतरच्या साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली आहे. सरकारपक्षातर्फे ॲड. सुनील हांडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांच्या खंडपीठाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली आहे.
दरम्यान, खटला चालविण्यासाठी सरकारी वकील ॲड. सुनील हांडे यांना सासवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहाय्यक फौजदार शशिकांत वाघमारे, विद्याधर निचित आणि नवनाथ सस्ते यांनी मदत केली.