उरुळी कांचन , (पुणे) : जिवलग मित्रांची आर्थिक गरज भागवण्यासाठी दुसऱ्या मित्राने मोठ्या विश्वासाने स्वतःच्या घरावर-शेतीवर, त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे स्वतःच्या पत्नीच्या सोन्याच्या दागिन्यांवर विविध वित्तीय संस्थामधून कर्ज काढले आणि आर्थिक अडचणीत असलेल्या जीवलग मित्राला पैसे दिले. मात्र, त्याच जिवलग मित्राने कर्जाचे हप्ते भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पुण्यातील गुलटेकडी येथील फुलमार्केटमधील एका फुल व्यापाऱ्याने नायगाव (ता. हवेली) येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गुलाब गेनभाऊ चौधरी (वय ४१, रा. नायगाव, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या फुलांच्या व्यापाऱ्याचे नाव असून, त्यांनी २९ जुलैला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, मयत गुलाब चौधरी यांच्या पत्नी, कुंदा चौधरी यांनी शनिवारी (ता.५) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुंदा चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी रविंद्र रमेश दुर्गाडे व सुनील रमेश दुर्गाडे (दोघेही रा. भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली) या दोन सख्ख्या भावांविरोधात गुलाब चौधरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदा चौधरी या नायगाव परिसरात त्यांच्या कुटुंबीयासोबत राहतात. त्यांचे पती गुलाब चौधरी हे गुलटेकडी येथील फुलांच्या बाजारात फुलांचे व्यापारी म्हणून काम करत होते. त्याच ठिकाणी फुलांच्या खरेदी-विक्रीतून त्यांची ओळख रविंद्र दुर्गाडे व सुनील दुर्गाडे व अमोल दुर्गाडे तीन सख्ख्या भावांशी झाली. दुर्गाडे बधूंचे भेकराईनगर येथे पुरंदर फुल भांडार या नावाने फुल व हार विक्रीचे दुकान आहे. दुर्गाडे हे चौधरी यांच्याकडून कधी रोख तर कधी उधारीवर फुले घेऊन जात होते. यातून सहा वर्षांपूर्वी फुलांची उधारी ५ लाखांपेक्षा जास्त झाली होती. यावेळी चौधरी यांनी दुर्गाडे यांना उधारी मागितली. दुर्गाडे यांनी सांगितले की, ‘आमच्या जागेवर अगोदरच कर्ज आहे. त्यामुळे आम्ही उधारी देऊ शकत नाही.
स्वत:च्या जागेवर काढले कर्ज
गुलाब चौधरी यांना शेतकऱ्यांना फुलांचे पैसे द्यावयाचे असल्याने चौधरी यांनी काहीही करा पण पैसे द्या असा तगादा दुर्गाडे यांच्याकडे लावला. यावेळी दुर्गाडे यांनी चौधरी यांना एक जिवलग मित्र या नात्याने त्यांच्या नायगाव येथील घर व जागेवर कर्ज काढून द्या, संबंधित कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तयार असल्याचा तोडगा सूचवला. चौधरी यांनीही आपला जिवलग मित्र अडचणीत असल्याने चौधरी यांनी दुर्गाडेंच्या सुचनेनुसार स्वतःच्या नायगाव येथील घर व जागेवर १४ लाख ९८ हजार रुपये कर्ज काढुन दुर्गाडे बंधूंना दिले.
सुरुवातीला नियमित हफ्ते अन् नंतर…
गुलाब चौधरी यांच्याकडून मिळालेल्या पैशातून दुर्गाडे बंधुनी चौधरी यांची उधारी चुकती केली व राहिलेले पैसे आपल्या धंद्यात गुंतवले. कर्जाचे पैसे मिळाल्यानंतर सुरुवातीला दुर्गाडे बंधुनी गुलाब चौधरी यांच्या नावावरील कर्जाचे काही हफ्ते भरले. परंतु, त्यानंतर काही दिवसातच दुर्गाडे बंधूंनी आपला खरा रंग दाखवण्यास सुरवात केली. त्यानंतर मात्र किरकोळ कारणे सांगून हप्ते थकविण्यास सुरुवात केली. थकलेले हप्ते व त्यावरील व्याज मिळून गुलाब चौधऱी यांच्यावरील 15 लाखांचा कर्जाचा आकडा 17 लाखांवर काही दिवसातच पोचला.
भुलथापा देत पुन्हा कर्ज काढण्यास विनवणी
17 लाख रुपये या थकलेल्या कर्जासाठी बँकेने तगादा लावण्यास सुरुवात करताच बॅंकेचे थकलेले कर्ज भरण्यासाठी सुनील दुर्गाडे व रवींद्र दुर्गाडे या दोन भावांनी गुलाब चौधरी यांना पुन्हा एकदा गोड बोलण्यास सुरुवात केली. ‘आम्ही फार संकटात आहोत. मित्र म्हणून आणखी एकदा मदत करा’ असे सांगून, पुन्हा एका फायनान्स कंपनीतून 23 लाख रुपये कर्ज काढण्यास भाग पाडले. यावेळी त्या बँकेचे 17 लाख कर्ज फेडून उर्वरित राहिलेले पैसे दुर्गाडे बंधूनी घेतले.
यावेळी परत सुरुवातीला कर्जाचे हफ्ते भरले. मात्र, उर्वरित हफ्ते भरण्यास टाळाटाळ केली. यावेळी चौधरी यांनी सुनील दुर्गाडे व रवींद्र दुर्गाडे यांना कर्ज फेडण्यास विनंती केली. यावेळी दुर्गाडे यांनी चौधरी यांना सांगितले की, आमची एका ठिकाणच्या जमीन विक्रीचा व्यवहार झाला आहे. तुम्ही तुमचे सोने मोडून कर्ज भरा. जमीन विकल्यानंतर तुमचे पैसे देतो. यावेळी चौधरी यांनी घरातील सुमारे 15 तोळे सोने फुरसुंगी येथील एका सोनाराकडे गहाण ठेवून फायनान्स कंपनीचे थकलेले हप्ते भरले.
पैसे न करता उलट धमकीच
पहिल्या दोन वेळच्या अनुभवाप्रमाणे तिसऱ्या वेळीही दुर्गाडे बंधूंनी सोनाराकडून घेतलेल्या पैशाचे व्याज व फायनान्स कंपनीचे थकलेले हप्ते भरण्यास टाळाटाळ सुरु केली. सलग तिसऱ्यावेळी मदत करुनही, दुर्गाडे बंधू कर्जाचे हप्ते व सोनाराकडून आणलेल्या पैशाचे व्याज पैसे भरण्यास तयार नसल्याने गुलाब चौधरी मागील सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात नैराश्यात गेले होते.
तर दुसरीकडे ज्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्या फायनान्स कंपनीचे कर्मचारी वसुलीसाठी वारंवार घरी येत असल्याने गुलाब चौधरी वैतागले होते. त्यामुळे गुलाब चौधरी यांनी दुर्गाडे यांच्या घरी जाऊन त्यांना कर्ज भरण्याची विनंती केली होती. मात्र, दुर्गाडे यांनी कर्ज भरण्यास नकार देण्याबरोबरच ‘तुला काय करायचे ते कर, माझ्याकडे पैसे येतील तेव्हा तुला पैसे देईन’ असेही दुर्गाडे यांनी चौधरी यांना सुनावले होते. तसेच दुर्गाडे बंधूंनी गुलाब चौधरी यांना दमदाटी करुन पुन्हा दारात पाऊल न टाकण्याचे सांगितले होते.
धमकीमुळे चौधरी तणावात, उचललं टोकाचं पाऊल
रविंद्र दुर्गाडे व सुनील दुर्गाडे यांनी विश्वासाने घेतलेले पैसे न दिल्यामुळे व त्यांनी दिलेल्या दमदाटी, धमकी, वाईट वागणुकीमुळे गुलाब चौधरी हे मानसिकदृष्ट्या तणावाखाली होते. त्याच तणावातून २९ जुलैला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गुलाब चौधरी यांचा दशक्रिया विधी पार पडल्यावर त्यांच्या पत्नी कुंदा चौधरी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुर्गाडे बंधूंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
‘मैत्री’ या शब्दाला काळीमा फासणारी घटना
गुलाब चौधरी यांची आपला आर्थिक अडचणीत असलेला मित्र आर्थिक अडचणीतून बाहेर यावा या प्रामाणिक हेतूने गुलाब चौधरी यांनी मदत केली. स्वतःचे घर, जागा व पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून मित्राला पैसे दिले. परंतु ‘मैत्री’ या शब्दाला काळीमा फासणाऱ्या मित्रांनी, अडचणीत मदत करणाऱ्या मित्राची लाखो रुपयांची फसवणूक केली. तो आत्महत्या करील अशा परिस्थितीत त्याला आणून सोडले. सध्याच्या काळात कोणी कुणाला मदत करत नाही, असे आपण सर्वजण म्हणतो. या काळात जर गुलाब चौधरी यांनी मित्रांना मदत करुन चूक केली का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अशी फसवणूक होत असेल तर कोणीही कोणालाच मदत करत नाही, करणार नाही. त्यामुळे सहकार्य, निरपेक्ष मदत, निखळ मैत्री या शब्दांवरचा विश्वासच उडून गेला आहे. काला तस्मै नमः