Mumbai News : मुंबई : गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दोन उपसरपंच असावेत अशा प्रकारची तरतूद करावी, अशी मागणी आता केली जात आहे.
नाशिकच्या हेमंत चौधरी यांची मागणी
नाशिकच्या हेमंत चौधरी यांनी याबाबत मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लिहिले आहे. त्यात म्हटले की, (Mumbai News) महाराष्ट्र राज्यात सध्या सरकारने आपल्या सोयीसाठी दोन उपमुख्यमंत्री निवडले असून, तशाचप्रकारे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे सर्व ग्रामपंचायतमध्येही दोन उपसरपंच निवडण्याबाबत शासन स्तरावर तात्काळ विचार व्हावा.
तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावा-गावातही अनेक गट असतात, त्या गटापैकीच अनेक जण ग्रामपंचायत सदस्य म्हणून वेगवेगळ्या पॅनेलमधून निवडून आलेले असतात. ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर प्रत्येकालाच सरपंच किंवा उपसरपंच हे पद मिळावे, अशी अपेक्षा असते. (Mumbai News) त्यातच सरपंचपद राखीव असले तर इतरांना म्हणजे सर्वसाधारण खुल्या सदस्यांना संधी मिळत नाही. त्यातून अनेक जण नाराज होतात, सदस्यांची फोडाफोडी होते व काही वेळा सदस्यांची पळवापळवी देखील होते.
काहीवेळा यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार देखील होतो. त्यामुळे शासनाने दोन उपमुख्यमंत्र्यांप्रमाणेच दोन उपसरपंच निवडण्याची तरतूद केली तर अनेक ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षांच्या कालावधीत उपसरपंच होण्याची संधी मिळेल व सर्वांना आपल्या मर्जीप्रमाणे ग्रामविकासात योगदान देता येईल. (Mumbai News) यासंदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन परिपत्रक काढावे व त्याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती यामध्ये करण्यात आली आहे.