पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी नव्या शिंदे सरकारला टोला लगावला. महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरू आहेत. त्यामुळे एखाद्या संघटनेचे नाव खराब होते असे नाही तर महाराष्ट्राचे नाव खराब होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
“घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगतात. दिल्लीवाले मला विचारत होते की तुमच्याकडे मोबाईल नॉट रिचेबल आहेत, हे काय नवीन सुरू आहे, कुठला नेता असा असू शकतो जो नॉट रिचेबल नसेल? नेता हा 24 तास कामासाठी रिचेबल असला पाहिजे, तो उपलब्ध नसेल तर उपयोग काय?” असे सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या..
“सत्ता येते आणि जाते आपण लोकांसाठी काम करत राहायचे, जनतेची सेवा करणे महत्त्वाचे असते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह अनेकांनी योगदान दिले. त्यांच्यामुळे आज आपण हा मोकळा श्वास घेऊ शकतो.
-इतिहासात अनेक नावं नोंदलेली आहेत. पण असंख्य कुटुंबं अशी आहेत ज्यांची नोंदच नसेल. ज्यांचं नाव कदाचित कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात नसेल. पण आपल्या मनाच्या इतिहासात देशातील ज्या ज्या व्यक्तीने, महिला असू दे वा पुरुष ज्यांनी मोठा त्याग आपल्यासाठी केला त्यांच्यासमोर नतमस्तक होऊया.
-पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे आधुनिक भारताचे स्वप्न पाहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले. ज्याद्वारे आपल्याला मताचा अधिकार मिळाला, स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला, ज्या चौकटीत आपला देश आज 75 वर्षे चालला आहे. त्या संविधानासमोर आज आपण नतमस्तक व्हायला हवे.
-देशाचे पुढील सगळे काम महिलांच्या समतेच्या अधिकारांचे पालन करून होईल, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचे त्यांनी स्वागत केले. महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम महिलांना आरक्षण दिले, महिला समानतेचे ब्रीद धरून त्यांना निर्णय प्रक्रियेत आणले. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला. आज प्रधानमंत्री जे बोलत आहेत त्या निर्णयाचे बीज याच महाराष्ट्रात रोवण्यात आले.