Loni Kalbhor Crime | लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुरसुंगी (ता. हवेली) येथे केल्विन क्लेन या कपड्यांच्या ब्रँडेड कंपनीची नक्कल करून कपडे विकणाऱ्या दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसाराम किसनाराम खारोल, सावरराम रामदेव चौधरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सचिन गोसावी (वय ४१, रा. खार पूर्व, मुंबई) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ६ लाख ९८ हजार ८०० रुपयांचे डुप्लिकेट शर्ट, पॅन्ट जप्त केले आहेत. केल्विन क्लेन कंपनीचे बँडेड कपडे असल्याचे भासवून त्यांची विक्री केली जात होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गोसावी हे केल्विन क्लेन या कंपनीसाठी फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. मंतरवाडी हद्दीत राज गारमेंटस या नावाचे दुकान आहे. राज गारमेंट या दुकानात केल्विन क्लेन कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती सचिन गोसावी यांना मिळाली होती.
त्यानुसार पुणे शहर गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी व त्यांच्या पथकाने राज गारमेट येथे छापा टाकला. त्यावेळी दुकानात केल्विन क्लेनचे टॅग लावलेले डुप्लिकेट २०७ पॅन्ट, ४२ कॉटन पॅन्ट, १०८ शर्ट, ८२ टि शर्ट, ११ पॅन्ट असे एकूण ६ लाख ९८ हजार ८०० रुपयांचे बनावट ब्रँडेड कपडे आढळून आले. पोलिसांनी कॉपी राईट कायद्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!