Loni Kalbhor | लोणी काळभोर, (पुणे) : हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व ईतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. असे मत आरोग्य अधिकारी डॉ. रूपाली भंगाळे यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वतीने जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ. भंगाळे बोलत होत्या.यावेळी आरोग्य सहाय्यक सुनिल सुलाखे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संगीता रोकडे, आरोग्य सहाय्यिका नंदा शिंदे, औषध निर्माण अधिकारी अनुजा माळी, व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते.
डॉ. भंगाळे म्हणाल्या की, “डासांमार्फत प्रसारित होणाऱ्या प्रमुख आजारांमध्ये हिवताप, हत्तीरोग, चिकुनगुनिया व जॅपनिज एन्सेफेलायटीस (जेई) या आजारांचा समावेश होतो. या रोगाचा प्रसार वेगवेगळ्या डासांमार्फत होत असतो. हिवताप व इतर आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व बाबी जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच हिवताप नियंत्रण ही शासनासह प्रत्येकाची जबाबदारी आहे. ‘डासांपासून संरक्षण, हिवतापापासून रक्षण या उक्तीप्रमाणे हिवताप नियंत्रण सुद्धा माणसाच्याच हातात आहे.”
आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा…
सुलाखे म्हणाले, प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, परिसरात पाणी साचू देवू नये. खड्डे बूजवावे, साचलेली गटारी वाहती करावी, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकन लावावे, आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा, घरात किटकनाशक व मच्छरदाणीचा वापर करावा, जमिनीवरील टाक्या, डासोत्पत्ती स्थाने यामध्ये गप्पी मास्यांचा वापर करावा. संडासच्या व्हेट पाईपला घरगुती कापड बांधावा व ताप आल्यास रक्त नमुना तपासून घेण्याचे आवाहन केले. यावेळी जनजागृतीपर माहितीपत्रके वाटण्यात आली.