BJP News | बारामती : कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपली ताकद दाखवण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मुख्य पक्षांच्या उमेदावरांनी तयारी सुरु केली आहे. बारामतीमधील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आखणी केली जात आहे. त्यातच आता भाजपने बारामतीत मोठी ताकद उभी करत राष्ट्रवादीला शह दिला जाणार आहे.
राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आखणी…!
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूकीत भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन लढणार आहे. अशी माहिती भाजपच्या पदाधिकार्यांनी दिली. शेतकरी विकास पॅनेल तयार केले जाणार असून, त्या माध्यमातून राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले जाणार आहे. बारामतीत भाजप कार्यालयात शनिवारी (ता. 1) यासंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, माळेगावचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे, भाजप नेते दिलीप खैरे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, अॅड. जी. बी. गावडे, युवराज तावरे आदींची उपस्थिती होती.
तावरे म्हणाले की, ”बारामती तालुक्यातील शेतकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरत आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक एकतर्फी होऊ दिली जाणार नाही. केंद्र व राज्य सरकार विविध माध्यमांतून शेतकर्यांना न्याय देऊ पाहत आहे. परंतु, बारामतीत एकाच पक्षाकडे समितीची सत्ता असल्याने वाचा फोडायला कोणी तयार नाही. शेतकरी, हमाल मापाडी यांचे प्रश्न कायम आहेत. अनेक घटकांवर अन्याय होतो आहे.”