हनुमंत चिकणे
Solapur News | बार्शी, (सोलापुर) : हवामानाच्या अंदाजावर व्यापार करणारे व्यापारी व अवकाळी पाउस व ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षांचे दर कोसळले असून, ‘द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे’ अशी म्हणण्याची वेळ गुळपोळी, मालवंडी, सुर्डीसह मानेगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची ‘पोती’ ओळखल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
गुळपोळीसह मालवंडी, सुर्डी, मानेगाव परिसरात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून द्राक्ष दरात प्रचंड घसरण झाली आहे. दहा वर्षांपूर्वी मिळणारे दर आता मिळत असल्याचे अभूतपूर्व चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे.
यंदा द्राक्षाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच बँकांनी कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे द्राक्षासाठी उत्पादन खर्चही निघेना, अशी परिस्थिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.
यंदा द्राक्षाला किमान चाळीस ते पन्नास रुपये किलोपर्यंत भाव मिळेल, दोन वर्षांत झालेले नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, सध्या द्राक्षाला २० ते २५ रुपये किलो भाव मिळत असून, उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकर्यांनी प्रचंड खर्च करून द्राक्षाचे उत्पादन घेतले. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला चांगला भाव मिळत होता. मात्र, मराठवाड्यासह राज्यात पडलेल्या अवकाळीनंतर दरात प्रचंड घसरण झाली. द्राक्षासाठी केलेला खर्च वसूल करणेही अवघड झाले असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी नागेश बारवकर व भागवत चिकणे यांनी सांगितले.
यंदा द्राक्षबागांना रोगाचा फारसा फटका बसला नाही, त्यामुळे चांगले उत्पादन झाले. द्राक्षाच्या माणिकचमन, एस. एस. जम्बो, आर. के. या वाणाचे द्राक्षांची किंमत हि एकच असल्याने कोणत्याच द्राक्षाला दर नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे द्राक्षाला ही आता बुरे दिन आले आहेत. एकाच टप्प्यात तोडणीस आल्याने व इतर ठिकाणची द्राक्ष बाजारात दाखल झाल्याने दरात कमालीची घट झाली असल्याचे प्रविण चिकणे व योगेश चिकणे यांनी संगितले.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे अवेळी पावसाचे द्राक्ष उत्पादकांना ग्रहण लागले आहे. अवकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्यास शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्षे कमी दराने विकावी लागणार असल्याचे धनाजी मचाले व गणेश म्हेत्रे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांपेक्षा एजंटच झाले मोठे..!
पातळीवर व्यापार्याला जो एजंट बागा दाखवतो त्याला किलोला एक रुपया कमिशन दिले जाते. जो व्यवहारात मध्यस्थी करून व्यापाऱ्याला द्राक्षाचे फोटो पाठवितो त्याला किलोला दोन-तीन रुपये कमिशन दिले जाते. मात्र हा सर्व बोजा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यावरच आहे. यात गाव पातळीवरील एजंट मालामाल झाले आहेत, ते अनेक सोयीसुविधांचा लाभ घेत आहेत.
याबाबत बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य व प्रगतशील बागायतदार शिरीष चिकणे म्हणाले, “सध्या मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्चही निघत नाही. या संकटातून बाहेर पडण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. खते औषधांचे वाढलेले दर वाढलेली मजुरी, हप्ते यांचा मेळ ही बसू शकत नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
शेतकऱ्याची विवशता आणि अफूची शेती ; राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर