दीपक खिलारे
इंदापूर : बारामती-इंदापूर पालखी महामार्गावर मार्निंग वॉक साठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनांनी धडक देवून झालेल्या अपघातात दोघींचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना जंक्शन (ता. इंदापूर) येथे घडली आहे. बुधवारी (ता. २२) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अर्चना श्रीशैल सनमठ व अनिता शिवाजी शिंदे (रा. दोघी, आनंदनगर, जंक्शन, ता. इंदापूर ) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. दोघींच्या अशा अचानक मृत्यूमुळे आनंदनगर जंक्शन परीसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना सनमठ व अनिता शिंदे या दोघी मैत्रिणी आहेत. त्या दररोज बारामती-इंदापूर पालखी महामार्गावर मार्निंग वॉक करत . रोजच्या प्रमाणे बुधवारीही सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्याजवळून बारामती-इंदापूर राज्यमार्गाच्या सर्व्हिस रोडने मार्निंग वॉक करीत होत्या. त्याचवेळेस भरधाव वेगाने आलेल्या अजवड वाहनाने पाठीमागून ठोस दिल्याने अर्चना सनमठ यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिता शिंदे या गंभीर जखमी झाल्या होत्या.
दरम्यान, दवाखान्यामध्ये उपचार सुरु असताना अनिता शिंदे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वालचंदगर पोलिसांनी ताताडीने अवजड वाहनांचा शोध घेण्याचे काम सुरु केले आहे. सध्या बारामती ते इंदापूर दरम्यानच्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे.
जंक्शन चौकामध्ये ही काम सुरु असून काम करणारी अवजड वाहनेही भरधाव वेगाने रस्त्याने ये -जा करीत आहेत. अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.