पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यविधीवेळी ज्या-ज्या लोकांनी शोक व्यक्त केला, त्यानंतर सर्वपक्षीय शोकसभेत सहवेदना व्यक्त केल्या, ज्या लोकांनी १९८६ पासून दिवंगत जगताप यांच्यासोबत आतापर्यंत काम केले, असे अभिमानाने सांगितले. ते लोक पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांच्या पाठिशी का उभे राहिले नाहीत ? निवडणूक बिनविरोध होण्याची अपेक्षा असताना अश्विनी जगताप यांच्यावर दु:खातही प्रचारासाठी बाहेर पडण्याची वेळ का आणली ? असा सवाल भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी उपस्थित केला. तसेच, लक्ष्मणभाऊंच्या माघारी अश्विनीताईंच्या पाठिशी उभे राहाण्याची हिच ती वेळ, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले.
भाजपा- शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारसाठी भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांची प्रचार सभा झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, चिंचवडची पोटनिवडणुकीला अशाप्रकारे अचानक सामोरे जावे लागेल, असे कुणाच्याही ध्यानी-मनी नव्हते. लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यविधीला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहीले. त्यानंतर शोकसभा झाली. त्यावेळीसुद्धा सर्वपक्षीने नेते मंडळी उपस्थित राहीली. त्यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले.
गेल्या ३८ वर्षांच्या शहराच्या राजकारणात कार्य केलेल्या जगताप यांच्या आठवणी सांगताना सर्वांचा कंठ दाटून येत होता. आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात एखादी दु:खद घटना घडली, तर त्याच्या दु:खात आपण सहभागी होतो. त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो.
एक सामाजिक संवेदनशीलता असते, ती संवेदनशीलता दाखवून ही निवडणूक बिनविरोध व्हावी. मनात राग नव्हे, दु:खाप्रती सहवेदना हवी होती. याकरिता आम्ही प्रामाणिक पुढाकार घेतला. मात्र, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एका आपल्या बहिणीवर, लेकीवर दु:खाचा प्रसंग ओढावलेला असताना तीला प्रचारासाठी घराबाहेर पडण्याची वेळ आणली. लक्ष्मण जगताप असते, तर त्यांनी तुम्हाला तोडीस तोड उत्तर दिले असते. मात्र, आज आपल्या बहिनीसमान अश्विनी जगताप यांच्यावर दु:खद प्रसंग ओढावला असता, त्यांच्या विरोधात उभे राहताना लाज वाटली पाहिजे होती, असा घणाघातही आमदार लांडगे यांनी केला.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झाला. आयटी हब उभारण्यात आले. मात्र, या आयटीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर निवडले. कारण, या परिसराचा विकास आणि ओळख देशभरात झाली होती, हे विसरुन चालणार नाही, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
अश्विनी जगतापांसाठी पंकजाताईंनी हात जोडले…!!
स्व. गोपिनाथ मुंडे यांचे पिंपरी-चिंचवड शहरावर अनेक उपकार आहेत. पंकजा मुंडे यांच्या रुपाने मुंडेसाहेबांचे दर्शन झाल्याची भावना येथील जनमानसाची आहे. आज पंकजा मुंडे यांनी अश्विनी जगताप निवडून याव्यात म्हणून लोकांना हात जोडले. आपल्या भागातील नागरिकांना आवाहन केले. कोपरा सभा, बैठका घेतल्या. याबाबत आमदार लांडगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.आरोपांना प्रत्युत्तर नव्हे, विकासकामे घेवून लोकांसमोर जाणार…!!
निवडणुकांसाठी प्रत्येक पाच वर्षांना प्रत्येक पक्ष-नेता आपआपल्या परीने लेखाजोखा मांडत असतो. त्यानुसार काम करीत असतो. मात्र, लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासनू सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना एकत्र घेवून काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कधीही पक्षीय भेदभाव केला नाही. अशा नेत्याच्या निधनानंतर जगताप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपाचे नेते आहेत. ही निवडणूक उत्तर देण्याची नाही. ही निवडणूक २०१७ पासून भाजपाच्या माध्यमातून गेल्या ३८ वर्षांत लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या विकासकामे घेवून आम्ही लोकांसमोर जाणार आहोत, असा दावा आमदार लांडगे यांनी केला.शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, रेडझोन हे प्रश्न कुणी निर्माण केले?
भूमिपुत्रांपासून कामगारांपर्यंत अनेक नेत्यांनी आपल्याला आश्वासने दिली. मात्र, कुणी पूर्ण केली नाहीत. जे लोक पाच वर्षांत काय केले? असा प्रश्न विचारतात. त्यांना मला विचारायचे आहे. सन २००८ साली शास्तीकर कोणी लादला? पिंपरी-चिंचवडमध्ये रेडझोन लागू झाला त्यावेळी सरकार कुणाचे होते? अनधिकृत बांधकामे पाडली जात होती? त्यावेळी आपण डोळे झाकले होते का? त्यावेळी पालकमंत्री कोण होते? सत्ता कुणाची होती? याच लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवडकरांवरील शास्तीकराचे ओझे कमी करण्यासाठी तुमच्या पक्षाला रामराम ठोकला होता. शास्तीकर माफीचा निर्णय भाजपा- शिवसेना महायुतीच्या सरकारने घेतला. तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस यांचे या निर्णयाबाबत अभिनंदन केले. शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कोणी आणले? असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, आम्हाला ही निवडणूक आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.