पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील मालखेड गावच्या हद्दीत नुडल्सच्या नावाखाली तब्बल ५० लाखांच्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला.
दारुसह टेम्पो असा ५२ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सातारच्या उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
ओमकारलाल भगवानलाल मेहता (रा. अदकालीया, जि. उदयपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावरून गोव्याहून नाशिककडे निघालेल्या टेम्पोमधून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती सातारच्या उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार या पथकाने मंगळवारी ( ता.१४ ) कऱ्हाड तालुक्यातील मालखेड गावच्या हद्दीत सापळा रचला.
त्यावेळी एक टेम्पो कोल्हापुरहून साताऱ्याच्या दिशेने जाताना या पथकाला दिसला. पथकाने हा टेम्पो अडवला. चालकाकडे चौकशी केली असता टेम्पोच्या आत नुडल्स असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, पथकाने टेम्पोच्या हौद्याची तपासणी केली असता टेम्पोमध्ये १८० मिली क्षमतेच्या विदेशी दारूच्या १९ हजार २०० बाटल्या, ७५० मिली क्षमतेच्या १ हजार ५०० बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दारुसह टेम्पो असा ५२ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच चालक ओमकारलाल भगवानलाल मेहता याला पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.