सागर जगदाळे
भिगवण : सोलापूर आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा डिकसळ (ता. इंदापूर) येथील १६७ वर्षाचा ब्रिटिशकालीन पूल अखेरची घटका मोजत असून आता पुलाचे एक एक दगड ढासळू लागले आहेत. जिंती, कोंढार चिंचोली, खातगाव, कात्रज, टाकळी व परिसरातील ऊस मालकांच्या आडमुटेपणामुळे या पुलावरून अवजड ऊसाची वाहतूक केल्यामुळे पुलाची वाट लागली आहे. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
डिकसळ येथील पुलावरून अवजड वाहनांवर वाहतुकीसाठी शासनाने घातलेली बंदी ही गेल्या १६ वर्षांपासून कागदावरच राहिली आहे. याला फक्त सरकारच जबाबदार आहे असे नाही तर या पुलावरून जर वाहतूक बंद व्हावी. यासाठी प्रशासनाने दोन्ही बाजूंना मोठमोठे लोखंडी बॅरॅकेट्स टाकले होते. पण काही अज्ञात ऊस टोळी मालकांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्या बॅरिकेट ची तोडफोड करून पुलावरून उसाचे ट्रॅक्टर नेण्यास सुरुवात केली. शेवटी जे घडायचे होते ते आज घडलेच.
याच कर्माचे आज हे फळ आहे की, या ब्रिटिशकालीन पुलाचे मध्यभागी असणारे आधाराचे दगड ढासळले आहेत. व दैनंदिन होणारी दळणवळण व्यवस्था बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या पुलावरून वाहने जात असताना पुलाचे निसटलेल्या दगडाखालील माती ढासळू लागली आहे. एखादे जर मोठे अवजड वाहन किंवा शाळेची बस यावरून जात असताना अनुचित प्रकार घडला तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डिकसळ येथील पुलाचे बांधकाम सन १८५५ साली करण्यात आले होते. गेली ४० ते ४२ वर्षे हा पूल पाण्याखाली आहे. पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील पुनर्वसित गावे कोंढार चिंचोली (ता.करमाळा) व डिकसळ(ता.इंदापूर) यांना जोडणारा भीमा नदीवरील हा पूल दुवा म्हणून काम करीत आहे. यावर अवजड वाहतुक बंद करण्यासाठी अडथळे टाकण्यात आले होते. पण तेही काढून अवजड वाहतूक सुरू केली. त्यामुळे आज हा पुल अखेरच्या घटका मोजत आहे.
दरम्यान, उजनी धरणाच्या पुनर्वसनानंतर रेल्वेमार्गावर रस्ते वाहतुकीसाठी मार्ग म्हणून हा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. गेल्या चार- पाच वर्षांपूर्वी कोकणातील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली होती, त्यावेळी प्राचीन ब्रिटिशकालीन पूल म्हणून याही पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते व ‘हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे’, अशा सूचना डिकसळ पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आल्या होत्या. पण प्रशासनाने लावलेल्या या सुचनाकडे साफ दुर्लक्ष करून त्यावरून अवजड वाहतूक केल्यामुळे पुलाला आपल्या अखेरच्या घटका मोजण्याची वेळ आली आहे.