राहुलकुमार अवचट
यवत : व्यायामशाळा विकास व क्रीडांगण विकास अनुदान योजना (सर्वसाधारण/ अनुसूचित जाती/ आदिवासी योजना) प्रस्ताव दाखल करणे करता पत्र प्रसिद्ध केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य ,पुणे विभागांतर्गत या योजना राबविण्यात येत असून कमाल ७ लाख अनुदान मर्यादा करण्यात आलेली आहे.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था , अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,शासकिय विभाग, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, आदिवासी व समाजकल्याण विभागांतर्गत शासकिय आश्रमशाळा यांना खुली व्यायामशाळा ( ओपन जिम) व व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी ७ लाख रुपये मर्यादित व्यायाम साहित्याचा पुरवठा करण्याचे प्रस्तावित केले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा उपलब्ध असेल तर तेथे व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. तर दलितवस्ती किंवा जवळच्या परिसरात सुयोग्य मोकळी जागा उपलब्ध असल्यास खुले व्यायामशाळा (ओपन जिम) साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत ग्रामपंचायतीचा प्रस्ताव जोडावा लागेल याबरोबरच आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी शाळा तसेच आदिवासी क्षेत्रातही लाभ घेता येतात.
दरम्यान, क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत शाळांना ३ लाख रुपये मर्यादेत विविध खेळांचे क्रीडा साहित्य वाटपांचे नियोजन असुन या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र विभागांनी ३१ आॕगस्ट २०२२ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , येरवडा पुणे येथे विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.