लोणी काळभोर, (पुणे) : तुला माझ्या बापाची शेती फुकट पाहिजे काय?, थांब तुझा काटाच काढते, असे म्हणून शेतजमिन भांडणाच्या रागातून नंणदेने भावजयीच्या डोक्यात दगड घालून, काठीने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथे घडली आहे. मंगळवारी (ता. २७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
याप्रकरणी मनिषा सुदाम वीरकर (वय ४३, रा. वीरकर मळा, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुजाता सुरज सावंत (वय ५०, रा. कवडीपाठ, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हिच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा वीरकर यांच्या पतीचे १० वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्या आपली आई, २ मुलांसह रहात असून आंगणवाडी सेविका म्हणून लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत काम करतात. त्यांच्या सासर्याची शेतजमीन आहे. हि जमीन मनिषा वीरकर या कसत आहे.
सासरे त्यांच्या शेजारी एकटेच राहतात. दीड महिन्यांपूर्वी त्यांची नंणद सुजाता सावंत ही सासरे सोबत राहण्यास आली. व तिला जमीन विकून टाकायची असे म्हणत असे.
शेतजमिनीवरून वीरकर व सावंत यांच्यात वारंवार भांडणे होत होती. मंगळवारी (ता. २७) वीरकर या शेतात हरभरा खुरपत असताना त्यांची नंणद पाठीमागून आली व तिने त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्या जमिनीवर पडल्यावर काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तुला माझ्या बापाची शेती फुकट पाहिजे काय?, थांब तुझा काटाच काढते, म्हणजे तुझा शेताचा विषयच खल्लास होऊन जाईल, असे म्हणून तिला मारहाण करुन गंभीर जखमी केले.
दरम्यान, होणारी मारहाण पाहून फिर्यादी या जीव वाचविण्यासाठी त्या तेथून पळून गेल्या. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वीरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे करीत आहेत.