पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सत्र परीक्षा मंगळवारपासून (ता.२७) प्रत्यक्ष पद्धतीने सुरू होणार आहे. तसेच आता परीक्षा ऑफलाइन होणार असल्याने उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनाची सुविधा लागू राहणार आहे.
याबबत अधिक माहिती देताना परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले की, विद्यापीठाची सत्र परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होते. मात्र करोना काळात बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका सत्र परीक्षांना बसला आहे.
त्यामुळे आता २७ डिसेंबरपासून या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षांचे वेळापत्रकही टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना विद्यापीठाने प्रसिद्ध केल्या आहेत.
पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नियमित आणि राहिलेल्या विषयांच्या (बॅकलॉग) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यानी संकेतस्थळावर अभ्यासक्रम अंतर्गत जाहीर करण्यात आलेले समकक्ष विषय जाणून घ्यावेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित राहतील. संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी एका बेंचवर एकच विद्यार्थी अशी बैठकव्यवस्था करावी, असे आवाहन काकडे यांनी केले आहे.
दरम्यान, मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित महाविद्यालयांनी परीक्षांचे नियोजन करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले. ऑनलाइन परीक्षेवेळी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनाची सुविधा देण्यात आली नव्हती.
मात्र आता प्रत्यक्ष परीक्षा होणार असल्याने ही सुविधा लागू राहील. त्याबाबत विद्यार्थ्यांना संबंधित विभागामार्फत स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. असेही परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या सूचना…
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी एक तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. विद्यापीठ परीक्षा आणि स्पर्धात्मक परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळेस येत असल्यास संबंधित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली जाईल. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याने गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास संबंधित विद्यार्थी हा कारवाईस पात्र असेल.