सोलापूर : सोलापूर जिल्हा कार्यालयावर लग्न न झालेल्या तरुण मुलांनी बाशिंग बांधून, नवरदेवाचे वेशात घोड्यावर स्वार होत लग्नासाठी मुलगी देण्याची मागणी करत होम मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढला आहे. सोलापुरातील ज्योती क्रांती संघटनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.
या संघटनेतील तरुणांनी हातात ‘कोणी मुलीगी देता का मुलगी लग्नासाठी या पामराला’, ‘बेटी बचाओ’, अशा मजकुराचे फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नवरदेव मंडळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान होत आहे, त्यामुळं सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोलापुरातील अनेक मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत. गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
गर्भलिंग निदान कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची मागणी मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांनी केली आहे. तसेच ते म्हणाले मोर्चाचं कारण काहीसं मजेशीर वाटत असलं तरी त्यामागचा उद्देश मात्र गंभीर आहे. महाराष्ट्रात गर्भलिंग निदान कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मुलींचे प्रमाण कमी होत आहे. परिणामी मुला मुलींचं प्रमाण विषम असल्यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात गर्भलिंग निदान कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी अशी मागणी यांच्या मध्यमातून करण्यात येणार आहे.
दरम्यान, हा अनोखा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ज्योती क्रांती संघटनेने केली. या अनोख्या आंदोलनाची चर्चा सोलापुरात चांगलीच रंगत आहे.