पुणे : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्यातील नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या मार्गावरील महत्त्वाचे तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांना कमी वेळेत पोहोचता येणार आहे. आता समृद्धी महामार्गावर आता २४ तास पाइपलाइनद्वारे सीएनजी उपलब्ध होणार आहे.
आता त्या दृष्टिकोनातून तयारीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी इंधनासाठी एरवी महामार्गाच्या बाजूंना असलेल्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा समृद्धी महामार्गावर दिसणार नाहीत. समृद्धी महामार्गाची नगर जिह्यातील लांबी २९.४० किलोमीटर आहे.
राज्यातील बहुतांशी रस्ते व महामार्गावर सीएनजी इंधनाचे पेट्रोल पंप कमी संख्येने आहेत. त्यामुळे वाहनचालकांना सीएनजीचे इंधन भरण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. समृद्धी महामार्गावर थेट पाइपलाइनद्वारे पेट्रोल पंपचालकांना इंधनपुरवठा केला जाणार आहे.
सध्या बहुतांशी पेट्रोल पंपांवर टँकरच्या माध्यमातून सीएनजी इंधन पुरवले जाते. अनेकदा वेळेवर टँकरचे इंधन मिळत नसल्यामुळे पेट्रोल पंपचालकांना सीएनजी इंधन नसल्याचे फलक लावावे लागतात.
समृद्धी महामार्गावर गॅस ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सीएनजी गॅस पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यामुळे नगर व शिर्डीला 24 तास नैसर्गिक इंधन उपलब्ध होणार आहे. यामुळे याठिकाणी प्रवास करताना काही अडचण येणार नाही.