बारामती : परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले.
अजित पवार यांनी मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, कऱ्हा नदी सुशोभीकरण, विद्या प्रतिष्ठान येथील कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र (एआय सेंटर) तसेच श्रीमंत बाबुजी नाईक वाडा येथे सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथील कामे करताना इमारतीच्या खोलीत हवा खेळती राहील तसेच पुरेसा सूर्यप्रकाश येईल, यादृष्टीने कामे करावीत. डॉक्टरांना वैद्यकीय उपकरणे ठेवताना अडथळा निर्माण होणार नाही, याप्रमाणे टेबलची रचना करावी. वीजनिर्मितीकरीता अत्याधुनिक सौरऊर्जा उपकरणे बसवा. परिसरात अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्याकरीता आराखडा तयार करा.
प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसर विकसित करा; कामे करतांना वाड्याचे मूळ रूप जतन झाले पाहिजे. खोलीत स्वच्छ सूर्यप्रकाश राहील तसेच नागरिकांना स्पष्ट दिसेल असे विजेचे दिवे परिसरात लावावेत. दिवे लावताना नागरिकांच्या सुरक्षितेतचाही विचार करावा. भिंती, फरश्यामधील फटी राहता कामा नये. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोईस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.