पुणे : पुणे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनीमधील ‘ओपन स्पेस’ची ६ हजार ५४ चौरस मीटर जागा न्यायालयाच्या आदेशानुसार लक्ष्मीबाई चास्ट चॅरिटेबल ट्रस्टने ताब्यात घेतली आहे. या जागेच्या ताब्यावरून पुणे महानगरपालिकेत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
पुणे महापालिकेने १९८८ साली विजयानगर कॉलनी येथील ओपन स्पेस या जागेचा गैरवापर होत असून, या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीप्रमाणे जागा मालकास नोटीस पाठविली होती. केवळ एक रुपयाच्या नाममात्र मोबदल्यात ही जागा पालिकेने ताब्यात घेतली. त्याविरुद्ध ट्रस्टने कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती. या दाव्याचा १९९९ साली निकाल लागला. सदर निकालानुसार जागेचा ताबा घेण्यापासून पालिकेला मनाई करण्यात आली होती. ही जागा ताब्यात घेताना आवश्यक ती प्रक्रिया पार पाडली गेली नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. यानंतर पालिकेने २००० साली पुन्हा जागा ताब्यात घेण्यांची प्रक्रिया सुरू केली. पालिकेने यासंदर्भात जाहीर प्रकटन दिले होते. तसेच ट्रस्टला नोटीस पाठविली होती. त्या वेळी पालिकेने पुन्हा ताबा घेतला. याविरुद्ध ट्रस्टने पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागितली.
या दाव्याचा २००७ साली निकाल लागला. तेव्हाही पुणे महापालिकेच्या विरोधात निकाल गेला होता. महापालिकेने पुन्हा एकदा २००८ साली वरिष्ठ स्तर न्यायालयात दाद मागितली. परंतु, यावर सुनावणीच झाली नाही. दरम्यान, ट्रस्टने २०२० साली न्यायालयात दरखास्त दाखल करून २००७ च्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात महापालिकेला नोटीस मिळाली नाही, असा दावा विधी विभागाकडून केला जात आहे.
निर्णयाविरुद्ध अपील करणार
या जागेच्या ताब्याच्या कागदपत्रांवर महापालिकेच्या वतीने कोणी सह्या केल्या नाहीत. न्यायालयाकडे पालिकेच्या विधी विभागाने अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये दरखास्तीवर अंमलबजावणी करण्यापूर्वी न्यायालय कोणत्या गोष्टींचा विचार करू शकते याची माहिती दिली आहे. महापालिकेने ताबा देण्यास विरोध केला आहे. या हरकतीचा विचार करावा असे अर्जात नमूद केले आहे. या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासंदर्भात विधी विभागाकडून विचार केला जात आहे, असे पालिकेच्या विधी सल्लागार अॅड. निशा चव्हाण यांनी सांगितले.