पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर परिमंडळ २ च्या कार्यक्षेत्रातील तब्बल १५८ रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी कारवाई केली आहे. त्यांना परिमंडळ २ च्या कार्यक्षेत्रातील सहकारनगर, स्वारगेट, भारती विद्यापीठ, लष्कर, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. या बरोबरच ६ गुंडांना २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना परिमंडळ २ च्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास, वास्तव्य करण्यास तसेच कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यास, सार्वजनिक रित्या वावरण्यास तसेच ज्यामुळे सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्यु करण्यास सक्त मनाई करण्यात आले आहेत.
परिमंडळ २ मधील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेले, त्यात जाळपोळ करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर हत्यार वापरणे, धमकी देणे, खंडणी, अपहरण, दंगा करणे, दरोडा तयारी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे असलेल्या रेकॉर्डवरील ६ गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार करण्यात आले आहे.
यामध्ये कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील गुन्हेगार राज अमित गुंजी (वय-२०, रा. कोरेगाव पार्क), बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्ष ऊर्फ भाव्या नितीन आडसुळ (वय-२१, रा. ताडीवाला रोड), सुषमा भिमा विधाते (वय-३२, रा. ताडीवाला रोड) यांचा समावेश आहे. तर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेजस महादेव खाटपे (वय-१९, रा. कल्याण मोरगिरी, ता. हवेली, सध्या रा. आंबेगाव), तुषार दिलीप माने (वय-२०, रा. आंबेगाव), अक्षय सुनिल येवले (वय-२९, रा. आंबेगाव खुर्द) यांचा समावेश आहे.