शिरूर : शिरूरमध्ये आज महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले, आमदाराच्या मुलाला काहींनी त्रास दिला, छळ केला अशी बातमी वाचली. त्यात माऊली कटके यांच्यावर आरोप लावले. निवडणुकीत भावनिक मुद्दा करून लोकांची मते मिळवण्यासाठी जर काही लोक इतक्या खालच्या थराला जात असतील तर हे दुर्दैव आहे. खुल्या मनाने निवडणूक लढवा पण कसला रडीचा डाव, अशी टीका अजित पवार यांनी शरद पवार गटावर केली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, ९ नोव्हेंबर २०२४ शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मांडवगड येथे अशोक पवार यांचा प्रचार सुरू होता. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते प्रमुख आरोपी भाऊसाहेब कोळपे यांनी उमेदवाराचे चिरंजीव ऋषिराज पवार यांना पक्षात काही लोकांचा प्रवेश करायचा आहे, असं सांगून एका बंगल्यात नेले. त्या बंगल्यात या आरोपीने काही अश्लील व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी भाऊसाहेबांनीच त्याला दिली आणि पैशाची मागणी केली. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला.
त्यामध्ये बदनामी आमची करण्यात आली. मला कळल्यानंतर संबंधितांना सांगितले, कठोर तपास करा, कुणीही असेल सोडायचा नाही. आमचे चुकले असेल तर आम्ही चूक मान्य करू. तीन आरोपी या गुन्ह्यात अटक केले. कोळपे यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी हे केले असं कबूल केले आहे. माझे पीडीसीसी बँकेचे १५ लाखाचे कर्ज आहे, त्यातून मी गुन्हा केला. भाऊसाहेब कोळपे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला. या गुन्ह्यातील मोबाईल आणि व्हिडिओ जप्त केले. या गुन्ह्यात कुठलाही राजकीय उद्देश दिसून येत नाही, हे तपासात उघड झाले आहे , असं अजित पवारांनी सभेत बोलून दाखविले.
अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा राजकीय इतिहास काढला
शिरूरच्या सभेत अजित पवार म्हणाले की, सतत निष्ठा बदलणारी ही व्यक्ती त्याने स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात याला नैतिक अधिकार आहे का? तुम्ही छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे भूमिका करता, सगळ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मात्र टीका करून शिरूरच्या लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल करत अजित पवारांनी अमोल कोल्हे यांचा राजकीय इतिहासच काढला.
पुढे म्हणाले, अलीकडे काहींना फार उत्साह आलेला आहे, त्यात आपले खासदार, मी आजपर्यंत दुर्लंक्ष करत होतो, परंतु रोज कुठलीही सभा असली की गुलाबी जॅकेट बोलतो. माझं जॅकेट गुलाबी नाही, तुमचा चष्मा बदला, जांभळ खाल्ल्यानंतर जी बी असते त्याचा रंग तो आहे. सारखी टीका करतोय. आमच्या निष्ठेबद्दल बोलतो. तुम्ही आमची निष्ठा काढावी? निष्ठेबद्दल हे बोलतायेत, आधी राज ठाकरेंकडे गेले, त्यानंतर त्यावेळच्या शिवसेनेत प्रवेश केला, भाषणाची सुरूवात करताना पहिल्यांदा उद्धव ठाकरेसाहेब आपल्याला मानाचा मुजरा असं करायचा. सगळे रेकॉर्ड काढा असा टोला अजित पवारांनी लगावला.