पुणे : महायुतीच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. सदाभाऊ खोत यांच्या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, खोत यांनी त्यांनी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या याच विधानावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांना थेट फोन कॉल करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी अजित पवारांनी फोन करुन सदाभाऊ खोत यांना म्हणाले की, “महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, तसेच सुसंस्कृतपणे कसं बोलायचं असतं, कंबरेखालचे वार कसे करायचे नसतात, यांच उदाहरण घालून दिलेलं आहे. काही आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु ते मांडण्याची एक पद्धतही असतेच. तेच आपल्याला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिकवलेलं आहे. तीच पद्धत वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, पवार साहेब, विलासराव देशमुख अशा अनेक मान्यवरांनी पुढे सुरु ठेवली आहे. पण सदाभाऊ खोत यांनी काल (बुधवारी) जे काही वक्तव्य केलं, ते निषेधार्ह आहे. त्याचा तीव्र शब्दांत मी कालच निषेध केला आहे. असं अजित पवार यांनी सांगितलं.
पुढे अजित पवार म्हणाले, “मी फक्त एवढ्यावरच थांबलेलो नाही. मी सदाभाऊ खोत यांना फोनही केला होता. तुमचं हे स्टेटमेंट आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. हे तुम्ही बंद करा, असं मी त्यांना सांगितलं. अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर बोलणं, हे चुकीचं आहे.”
दरम्यान, सांगलीतील जत येथील सभेत महायुतीतील घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. त्यांच्या या टीकेवर अनेकांनी आपले मत व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.