पुणे : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून काही थोड्याच दिवसात प्रचाराला ही सुरवात झाली आहे. तसेच आता उमेदवारी मागे घेण्याची डेडलाईन आता जवळ आली आहे. त्यामुळे महायुतीकडून बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असून भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाराज इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्षात जाऊन भेट घेतली आहे. काही जणांनी मनधरणी करण्यात त्यांना यश आलं आहे. परंतु, खडकवासला मतदारसंघातील एकाही इच्छुक नाराजाकडे साधे फिरकले सुद्धा नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस पुण्यात नाराजांची मनधरणी करण्यासाठी आले होते. पण खडकवासला मतदारसंघातील एकाही इच्छुक नाराजाकडे साधे फिरकले सुद्धा नाही. फक्त मुरलीधर मोहोळांच्या फोनवरून संबंधितांशी जुजबी संपर्क साधण्यात आल्याची माहिती मिळत आहे. खडकवासला मतदार संघातच सर्वाधिक नाराजी असल्याने भीमराव तापकिरांचे तिकिट उशिराने झालंय. पण तरीही फडणवीस खडकवासल्यातील नाराजांकडे फिरकले नाही, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. खडकवासला मतदारसंघातून माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, यांच्यासह येडे पाटील आणि नागापुरे हे दोन माजी नगरसेवक उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक होते. विशेष म्हणजे, फडणवीस खडकवासला सोडून इतर मतदारसंघातील सर्व नाराजांना भेटले. त्यामुळे पुणे भाजपातली नाराजी पुन्हा चर्चेत आली आहे.
कुणाकुणाच्या घेतल्या भेटी?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराज नेते सनी निम्हण यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार विनायक निम्हण यांचे सुपुत्र सनी निम्हण लढण्यासाठी इच्छुक होते. भाजपकडून त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. सनी निम्हण यांनी काँग्रेस पक्षाकडूनही उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी निम्हण यांच्या निवासस्थानी जात सनी निम्हण यांची नाराजी दूर केली आहे.
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीनाथ भिमाले यांची भेट घेतली. श्रीनाथ भिमाले हे पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी पर्वतीमधून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने यंदाही भाजपकडून आमदार माधुरी मिसाळ यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. मिसाळ यांना उमेदवारी दिल्याने भिमाले प्रचंड नाराज होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी भिमाले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढली आहे.