मुंबई : अदाणी समूहाची कंपनी रीन्यू एक्झिम डीएमसीसीने आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेडमधील ४६.६४ टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी करार जाहीर केला आहे. इटालियन-थाई डेव्हलपमेंट पब्लिक कंपनी लिमिटेडकडून हा हिस्सा अदाणी समूहाची कंपनी खरेदी करणार आहे. रीन्यू एक्झिम डीएमसीसीने हा हिस्सा ४०० रुपये प्रतिशेअर या दराने विकत घेण्याचा करार केला आहे. यासाठी कंपनीला ३२०४ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. या कराराद्वारे अदाणी समूह आपली अभियांत्रिकी क्षमता वाढवत आहे.
विमानतळ, महामार्ग आणि मेट्रो प्रकल्पांसाठी हे आवश्यक आहे. रीन्यू एक्झिम डीएमसीसीने अतिरिक्त २६ टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी खुली ऑफर जाहीर केली आहे. कंपनी सार्वजनिक भागधारकांकडून ५७१.६८ रुपये प्रतिशेअर दराने खरेदी करेल. ही ओपन ऑफर पूर्णपणे सबस्क्राइब झाली, तर कंपनी २५५३ कोटी रुपये खर्च करेल. खुल्या ऑफरची किंमत शुक्रवारच्या ५३९ रुपयांच्या बंद होण्याच्या तुलनेत ६ टक्के जास्त आहे.
आयटीडी सिमेंटेशनच्या शेअरच्या किमती गेल्या एका वर्षात १८० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. गेल्या ६ महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ४४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप ९,१५२. ८४ कोटी रुपये आहे. शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्च पातळी ६९४.४५ रुपये आणि ५२ आठवड्यांची निम्न पातळी १८८. २० रुपये आहे.