पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील एक्स्प्रेस गाडीच्या समोर दोन जणांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 6च्या सुमारास घडली आहे. अद्यापही या दोन व्यक्तींची ओळख पटली नसून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 2 वर काल रात्री (सोमवारी) एक्स्प्रेस गाडी आली होती. त्यानंतर या गाडीतून सर्व प्रवाशी खाली उतरले. दरम्यान, आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास एक्स्प्रेस गाडी यार्डच्या दिशेने निघाली असताना एक पुरुष आणि एक महिला रेल्वे रुळावर जाऊन झोपले. त्यानंतर त्यांच्या अंगावरुन रेल्वे गेली.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोन मृत व्यक्तींच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. दोघेही मृत व्यक्ती 40 च्या वयोगटातील आहे. रेल्वे पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.