पिंपरी : सप्ताहाच्या कार्यक्रमात वडिलांच्या हातातून एका व्यक्तीने माईक काढून घेऊन अपमान केला. या रागातून मुलाने एकाच्या घरात घुसून चेहऱ्यावर केमिकल फेकले तसेच घराचे नुकसान करून मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २०) मध्यरात्री खेड येथे घडली. स्वयम सबाजी सावंत, सोनू बहिरू केदारी (दोघे रा. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जानेवारी २०२४ मध्ये सप्ताहाच्या कार्यक्रमात फिर्यादी यांच्या पतीने आरोपी स्वयम याच्या वडिलांच्या हातातून माईक काढून घेतला होता. त्या रागातून स्वयम याने फिर्यादी यांच्या घरी येऊन फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच पोल्ट्री फार्ममध्ये सफाईसाठी वापरले जाणारे फॉरमोलीन हे औषध फिर्यादी यांच्या पतीच्या चेहऱ्यावर टाकून त्यांच्या डोळ्यास दुखापत केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुकानाच्या शटर, दरवाजावर आणि दुचाकीवर दगड आणि दांडक्याने मारून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.