मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी आज उमेदावारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर युपीएकडून काँग्रेसनेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांचं नाव जाहीर केलं. उपराष्ट्रपती पदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी विरोधीपक्षाची शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत १७ पक्षांनी मार्गारेट अल्वा यांना आपला पाठिंबा दर्शवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसनेते मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, विरोधी आघाडीतील पक्षांसोबत यांच्यासोबत चर्चा करून माजी केंद्रीयमंत्री, माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचं नाव उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्चित केलं आहे. मार्गारेट अल्वा यांना विरोधी गटातील १७ पक्षांचा पाठिंबा असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै असून मतदान 6 ऑगस्टला होणार आहे.
कोण आहेत मार्गारेट अल्वा
मार्गारेट अल्वा या काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील कनारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. १९७४ ते १९९८ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. ६ ऑगस्ट २००९ ते १४ मे २०१२ पर्यंत त्यांनी उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले. उत्तराखंडच्या राज्यपालपदी काम केल्यानंतर त्या २०१२ ते २०१४ पर्यंत राजस्थानच्या राज्यपाल होत्या.
त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्या आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत. त्यांना मर्सी रवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मार्गारेट अल्वा यांना कायद्याचं चांगलं ज्ञान आहे. त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. तसेच, त्यांना प्रदीर्घ काळाचा राजकाणातील अनुभव आहे.