उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोधे-काकडे वस्ती परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. याबाबत दैनिक ‘पुणे प्राईम न्यूज’ने कोरेगाव मूळ येथे ऐन सणासुदीच्या तोंडावर विजेचा लपंडाव या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत विद्युत रोहित्राची दुरुस्ती महावितरणच्या वतीने करण्यात आली असून याबाबत कोरेगाव मूळ ग्रामस्थांच्या वतीने दैनिक ‘पुणे प्राईम न्यूज’चे आभार मानले.
कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोधे-काकडे वस्ती परिसरात सणासुदीच्या तोंडावर वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याबाबत दैनिक ‘पुणे प्राईम न्यूज’ने आवाज उठवला होता. जंम्प तुटणे, रोहित्र गरम होऊन बंद पडणे त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित होत होता. याबाबत कोरेगाव मूळचे तंटामुक्ती अध्यक्ष मुकिंदा काकडे यांनी पुणे प्राईम न्यूजकडे पाठपुरावा केला होता. पाठपुराव्याने महावितरणने तातडीने नादुरुस्त झालेले रोहित्र बदलले. जळालेली वीजयंत्रणा दुरुस्त करून परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा तत्परतेने सुरळीत करण्यात आला.
उपकेंद्रात वेळेवर मेंटेनन्सची कामे केली जात नसल्याने ‘ब्रेक डाऊन’होत होते. सणासुदीच्या तोंडावर धार्मिक वातावरण निर्माण झाले असताना महावितरण कंपनी या आनंदावर विरजण घालत असल्याचा प्रकार सुरू होता. याबाबत सहायक अभियंता व वीज कर्मचाऱ्यांना विचारले असता वीज पुरवठा खंडित का झाला, याची माहिती आपल्याला नसल्याचे सांगत आहेत. यामुळे नेमका वीज पुरवठा सुरू होण्यास किती वेळ लागेल याची माहिती मिळत नव्हती.
दरम्यान, ग्रामस्थांनी याची माहिती पुणे प्राईम न्यूज ला दिली होती. त्यानुसार बातमी प्रसारित झाल्यानंतर महावितरकडून तात्काळ रोहित्राची दुरुस्ती करण्यात आली असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.