उरुळी कांचन, (पुणे) : गावठी पिस्तुलची विक्री करून जास्त पैसे कमवता येतील या कारणामुळे मध्यप्रदेशातून पिस्तुल खरेदी करून शिरूर शहरात विक्री करण्यासाठी आलेल्या नगर जिल्ह्यातील दोघांना शिरूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 5 गावठी पिस्टल व 4 जिवंत काडतूस असा 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.
अनिकेत विलास गव्हाणे (वय -20, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), मंगेश दादाभाऊ खुपटे (वय- 20, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शनिवारी (ता. 28) ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरूर शहराचे बायपास रोडलगत असणारे दि स्पॉट नाना हॉटेल जवळ दोन इसम उभे असून त्यांचे जवळ अवैध गावठी पिस्तुल असून ते विक्रीसाठी आणलेले आहेत. सदरची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी पंचांसमक्ष छापा कारवाई केली. यावेळी अनिकेत गव्हाणे व मंगेश खुपटे यांना ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष करण्यात आलेल्या अंगझडतीत अनिकेत गव्हाणे याचे कंबरेला खोचलेले 2 गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुस तसेच मंगेश खुपटे याचे कंबरेला खोचलेले 3 गावठी पिस्तुल व 2 जिवंत काडतूस खोचलेले असे एकूण 5 गावठी पिस्तुल व 4 जिवंत काडतूस असा एकूण 1 लाख 02 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यानुसार शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडे अधिक चौकशी केली असता गावठी पिस्तुलची विक्री करून जास्त पैसे कमविता येतील या कारणामुळे त्यांनी मध्यप्रदेश येथील सेंधवा येथून 1 महिन्यापुर्वी 5 पिस्तुल आणल्याची माहिती दिली. सदरचे गावठी पिस्तुल त्यांनी कोणाकडून कशापद्धतीने खरेदी केले आहेत, याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे. यातील आरोपी अनिकेत गव्हाणे याचेवर एक गुन्हा बेलवंडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबर 2024 मध्ये स्थानिक गुन्हे शाखा, शिरूर, शिक्रापूर, वालचंदनगर, यवत, हवेली, पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध गावठी पिस्तुल बाळगणारे व विक्री करणारे इसमांवर कायदेशीर कारवाई करून एकूण 17 अवैध गावठी पिस्तुल 29 जिवंत काडतूस जप्त करून मोठी कारवाई केली आहे.
सदरची कामगिरी शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस अंमलदार नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, विजय शिंदे, परशुराम सांगळे, निरज पिसाळ, निखील रावडे, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.